![]()
नवरात्रीच्या आदल्या दिवशीची गोष्ट….
बऱ्याच दिवसांपासून मुलींचे कपड्याचे कप्पे आवरले नव्हते, त्यामुळे त्यादिवशी explicitly वेळ काढून ऋतूचा कप्पा आवरण्यापासून सुरुवात केली. कपडे आवरता आवरता मी विचार करत होते कि ऋतूला न होणारे कपडे आपण मावशींच्या मुलीला देऊ. नुकत्याच घरकामाला एक नवीन मावशी लावल्या होत्या… त्यांना एक अवनी एवढा मुलगा आणि एक ऋतूपेक्षा लहान मुलगी असल्याचं मला माहिती झालं होतं. मुलाचं नाव वेदांत आणि मुलीचं दुर्वा. मला हि नावं इतकी आवडली म्हणून लक्षात राहिली. झाले दुर्वा ला ऋतूचे कपडे तर बरंच होईल. हे आणि अजून बरेच विचार करत आणि एकीकडे हात चालवत अखेरीस तिचा कप्पा आवरून पूर्ण झाला. टीशर्ट्स , पॅन्ट्स , फ्रॉक्स , नाईट ड्रेस अशा बऱ्याच कपड्यानी एक पिशवी भरली. काही ऋतूला आता न होणारे, काही होणारे पण तिला घालून अन आम्हाला बघून कंटाळा आलेले, काही अगदीच कमी वापरलेले पण घालायला आवडत च नाहीत असे अनेक प्रकारचे आणि खराब न झालेले कपडे जमले.
दुपारी मावशी आल्यावर मी त्यांना जरा साशंक होऊन च म्हणाले कि मावशी ऋतूचे काही कपडे काढून ठेवले आहेत तुम्ही तुमच्या मुलीसाठी घेऊन जाल का? साशंक होण्याची कारणं होती, एकतर नवीन च मावशी, त्यांना असे कपडे दिलेले आवडतील कि नाही माहिती नव्हतं , आपल्याला वाटायचं कि आपण स्वइच्छेने मदत करतोय पण त्यांना उगाच ते आवडलं नाही तर? माझी ऋतू जरा वयापेक्षा लहान च दिसते,त्यांची मुलगी तब्येतीने कशी ते माहिती नसल्याने तिला ते होतील कि नाही हि पण एक शंका होतीच. पण मी तरी त्यांना विचारलंच . त्यावर त्या लगेच हो म्हणाल्या आणि जाताना ती पिशवी घेऊन गेल्या.
दुसऱ्या दिवशी त्या आल्या तेव्हा मी कॉल मध्ये होते त्यामुळे आल्या आल्या आमचं बोलणं झालं नाही, पण त्या निघताना जेव्हा मी दार लावायला गेले तेव्हा माझ्या एकदम लक्ष्यात येऊन मी त्यांना विचारलं कि तुमच्या मुलीला झाले का हो ऋतूचे कपडे?
त्यावर उत्तर देताना मावशींच्या चेहेऱ्यावर एकदम चमक आली आणि अगदी हसत हसत त्यांनी होकारार्थी मान हलवत पिशवीतून मोबाईल काढला आणि मला म्हणाल्या कि झाले ना!! हे बघा तिचे फोटो….
मी एक एक फोटो बघत होते आणि माझ्या चेहेऱ्यावर हास्य उमलत होते. प्रत्येक फ्रॉक घालून, जमेल तसे मॅचिंग करून त्यांनी इतके छान फोटो काढले होते, त्यांची मुलगी एकदम खुश दिसत होती प्रत्येक फोटोत… लाजत, मुरडत होती , छान छान पोझ मध्ये बरेच फोटो काढले होते त्यांनी. आणि वर मला अगदी आनंदाने सांगत होत्या कि आज पिवळा रंग आहे ना नवरात्रीचा म्हणून आज पिवळा फ्रॉक घातलाय, स्टेट्स ला पण फोटो ठेवलेत ताई, तुम्ही नाही बघितले का? नेमकी मी सकाळपासून busy असल्याने बघितले नव्हते, त्यांना म्हंटलं नाही ना ओ , आता बघते.
त्या बाहेर पडल्यावर मी एकदम समाधानाने स्टेटस बघत बसले. मनात मावशीचे खूप आभार मानले, मला मन भरून joy of giving चा अनुभव दिल्याबद्दल.
असे तर आपण किती लोकांना किती वेगवेगळ्या कारणांनी काही ना काही देत असतो. पण काही मिळाल्यावर त्याची दखल न घेता ते आवडले आहे कि नाही हे सांगायची तसदी हि न घेणारे लोकं पाहिलेत मी. आपल्याला कोणी काही दिल्यावर देणाऱ्याला ती गोष्ट देण्याचे समाधान मिळवून देणारे लोकं फार कमी असतात हे त्या क्षणी प्रकर्षाने जाणवले. मावशींनी सांगितले नसते तर माझ्या मनाला फक्त आपण कप्प्यातला पसारा कमी केल्याचं कौतुक वाटलं असतं…
पण मावशींनी ही गोष्ट इतक्या सुंदर पद्धतीने सांगितल्यामुळे माझ्या मनाला जे काही समाधान मिळालं ते शब्दांत सांगणं खरंच अवघड आहे.
त्या क्षणी एक खूप परिपूर्ण जाणीव झाली की मी एका कुमारिकेची ओटी आनंदाने भरली आणि मावशींनी एका सवाष्णेची ओटी समाधानाने भरली….म्हणून आम्हा दोघींवर देवी मनोमन प्रसन्न झाली असावी….
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी इतका छान अनुभव आल्यामुळे मी खूप च आनंदी झाले. मावशी तर पुढच्या कामासाठी निघून गेल्या पण जाता जाता नकळत मला मन भरून positive wibes देऊन गेल्या.