![]()
सरता सरता आयुष्य सरले, घेऊन आले मध्यावर,
म्हटलं जरा मागे वळून पडताळू झालेला प्रवास इथवर
मनात आहे अनुभवाचा ठेवा अन् आशेचा किरण प्रखर,
ना मनात काही संकोच ना कोणते ओझे डोक्यावर
आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ होता “बालपण”
किती निरागस, किती खरे असतो ना प्रत्येकजण,
ना खोटेपणाचा लवलेश, ना मनात कसले कपटपण,
ना भविष्याची काळजी, ना कुठल्या नात्याचं दडपण
शाळा संपवून केले तारुण्यात अलगद पदार्पण,
नव्या मैत्रिणी, नव्या आकांक्षा, स्वप्नांचे नवीन अंगण
हळू हळू पंख पसरून आले उंच उडायचे सोनेरी क्षण
नोकरी, पती, संसार यात आनंदाने केले समर्पण
कधी आली संकटं, कधी आपोआप मिळाला आधार,
परिवाराची साथ अन् अर्थातच देवाचीही कृपा अपार.
चालत राहिले, झटत राहिले, सोडला नाही जगण्याचा निर्धार,
प्रामाणिकपणे शक्य तेवढ्या जबाबदाऱ्या केल्या पार
या संपूर्ण वाटेवर चालताना मनात आहे पूर्ण समाधान,
पार पाडलेल्या कर्तव्यांबद्दल उरात आहे दुर्दम्य अभिमान
प्रत्येक कामाचा, प्रत्येक नात्याचा केला मनापासून सन्मान,
म्हणून च आज स्थिर आहे मन, उघडतेय नवं सोनेरी पान
सगळ्यांसाठी झिजून आता वाटतंय थोडं स्वतःसाठीही जगावं,
सगळ्यांना आनंद देता देता आपल्या छंदानाही जोपासावं
नको कसली बंधनं आता थोडं एकटं ही भरकटावं
जरासं स्वच्छंदी होऊन पुन्हा आपल्याच घरट्यात विसावावं….