पकडा  पकडी…

2 comments 5 minutes read

Loading

Loading

आज बऱ्याच दिवसांनी, कामानिमित्त माझ्या बालपणीच्या मैदानावर जाण्याचा योग आला — तो म्हणजे दादरचं शिवाजी पार्क. नेहमीप्रमाणे लहान मुलांची आणि वयोवृद्धांची वर्दळ चालूच होती. काही तरुण क्रिकेटच्या प्रॅक्टिसमध्ये मग्न होते, तर वय ओलांडलेल्या आजी-आजोबांचा एक मेळावा एकमेकांच्या गप्पांमध्ये रमलेला दिसला.

या सगळ्यांमध्ये माझं लक्ष सर्वात जास्त वेधून घेतलं ते मैदानाच्या एका कोपऱ्यात खेळणाऱ्या ७-८ वर्षांच्या मुलांनी — ती शिवाशिवी खेळत होती. काहीजण याला पकडापकडी म्हणतात, तर काही पाठशिवणी. पण ही मुलं तो खेळ खेळताना बघता बघता मी अचानक माझ्या स्वतःच्याच बालपणीच्या आठवणीत हरवून गेलो.

आम्हीही हा खेळ अगदी मनापासून खेळायचो. किती साधा होता हा खेळ, आणि तरीही किती सुंदर दिवस त्यात जायचे! प्रत्येकजण मोजायचा — आज त्याच्यावर किती वेळा राज्य आलं, किंवा तिच्यावर किती वेळा. खेळ संपला की पुन्हा आपापल्या घरी परतायचो, मनात एक निखळ आनंद घेऊन.

दिवसामागून दिवस गेले, महिने गेले, वर्षं लोटली — आणि हा खेळ कुठेतरी काळाच्या ओघात हरवून बसला, असं वाटायला लागलं होतं. पण आजच्या या एका क्षणाने तो पुन्हा जिवंत केला.

हा विचार मनात घोळत असतानाच घरी कधी पोहोचलो, कळलंच नाही. आमच्या घरच्या मदतनीस बाईंनी गरमागरम चहाचा कप हातात दिला. चहा घेऊन, फ्रेश होऊन, रविवार म्हणून जरा निवांत बिछान्यावर पडलो. उद्या सोमवार — पुन्हा एकदा आयुष्याचा गाडा ओढायला सुरुवात. त्याआधी मनातल्या मनात एक उजळणी सुरू केली — या आठवड्यात ऑफिसचं काय काम करायचंय, घरचं काय बघायचंय, वैयक्तिक कोणकोणत्या गोष्टी मार्गी लावायच्या आहेत — याची यादीच जणू मनात तयार होत होती.

आणि हे सगळं करत असताना मनात अचानक एक विचार चमकून गेला — दुपारी बघितलेला तो पकडापकडीचा खेळ, आणि आत्ता आपण जे आयुष्यात खेळत आहोत, ते सुद्धा तसाच एक खेळ नाही का? किंबहुना, त्यापेक्षाही एक पाऊल पुढचा.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल — लहानपणीचा तो साधा खेळ, आणि आत्ताची ही धावपळ — याचा काय संबंध?

उत्तर अगदी सरळ आहे.

प्रत्येक दिवशी आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या मागे लागलेलो असतो — काहीतरी मिळवण्यासाठी, एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, काही जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी — मग त्या स्वतःसाठी असोत किंवा कुटुंबासाठी. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आपण काहीतरी पकडण्याच्या प्रयत्नात असतो.

आणि या आयुष्याच्या लपंडावात खेळणारे सवंगडी फक्त आपले मित्र नसतात — इतकाच काय तो फरक.

– शिक्षण पूर्ण करायचं आहे, म्हणून त्याच्या मागे धावतोय.

– नवीन नोकरी मिळवायची आहे, किंवा असलेल्या नोकरीपेक्षा चांगली नोकरी हवी आहे, म्हणून त्या शर्यतीत आहोत.

– नवीन घर घ्यायचं आहे, कारण असलेलं घर आता लहान वाटायला लागलंय.

– हवा तेवढा बँक बॅलन्स नाही, म्हणून तो कसा मिळवता येईल याच्या प्रयत्नात — म्हणजेच पैशांच्या मागे.

– स्वतःसाठी एक गाडी घ्यायची आहे…

अशा कित्येक गोष्टींच्या मागे आपण सतत लागलेले असतो — त्या मिळवण्यासाठी, पकडण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतो. आणि या शर्यतीला कुठेच अंत नाही. अर्थात, प्रत्येकाच्या वैयक्तिक पातळीवर हा खेळ कमी-जास्त प्रमाणात असू शकतो.

पण कधी आपण असा विचार करतो का — हा पकडापकडीचा खेळ आपण कधीपर्यंत आणि कुठवर खेळणार आहोत?

लहानपणी हा खेळ खेळताना जेवढा थकवा यायचा, त्याहून कितीतरी अधिक थकवा आज आपल्याला जाणवतो. फरक इतकाच — लहानपणीचा तो थकवा फक्त शारीरिक असायचा. आत्ताच्या या पकडापकडीचा थकवा मात्र शारीरिकपेक्षा कितीतरी अधिक पटीने मानसिक आणि बौद्धिक आहे.

लहानपणी या खेळात नियम साधा होता — दुसऱ्या खेळाडूला एकदा स्पर्श केला, की पुढचं राज्य त्याच्यावर यायचं, आणि आपली सुटका व्हायची. पण आत्ताच्या या खेळात मात्र उलटं आहे — आपण एखादी गोष्ट मिळवली, पकडली, की राज्य मात्र आपल्यावरच येऊन बसतं. मिळवलेल्या त्या गोष्टीचा आनंद फक्त काही काळापुरता टिकतो, आणि नंतर त्यापेक्षा आणखी चांगलं, आणखी मोठं मिळवण्याची हाव आपल्यालाच पुन्हा राज्य घ्यायला भाग पाडते. आणि मग काय — पुन्हा अधिक प्रयत्न, अधिक धावपळ, अधिक संघर्ष.

या पकडापकडीच्या नादात एक साधं सत्य दडलेलं आहे — याचा कधी कोणी विचार केलाय का? आता या खेळात कसलं आलंय सत्य, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. हे जाणून घेण्यासाठी स्वतःलाच काही प्रश्न विचारून बघा —

आपला श्वास आपण कायमस्वरूपी रोखून ठेवू शकतो का?

वाळू कधी घट्ट मुठीत पकडून ठेवता येते का?

वाहत्या नदीला समुद्रात सामावून जाण्यापासून आपण रोखू शकतो का? आणि तसं केलंच, तर काय होईल? तिथे फक्त एक साचलेलं, स्थिर पाण्याचं डबकं तयार होईल — जे कालांतराने आपला ताजेपणाच गमावून बसेल.

जितकी घट्ट आपण वाळू पकडण्याचा प्रयत्न करतो, तितकीच ती अधिक वेगाने हातातून निसटून जाते, आणि शेवटी उरतो तो फक्त रिकामा हात.

म्हणूनच मला वाटतं — आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा त्या वाळूसारखाच नाही का? आपण जे काही घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो, ते खरंच कायम आपल्यासोबत राहतं का? उलट, ज्या गोष्टी आपण जितक्या घट्ट पकडून ठेवतो, तितक्याच त्या लवकर आणि सहज आपल्यापासून निसटून जातात. मग त्यांना इतकं घट्ट धरून ठेवण्याचा हा अट्टाहास तरी कशासाठी?

आणि एकदा का ती पकडलेली गोष्ट हातातून निसटली, की त्याचं दुःख पचवणं प्रत्येकालाच जमतं का? नाही. ते प्रत्येकाच्या मानसिक स्थितीवर, त्याच्या आतल्या ताकदीवर अवलंबून असतं.

आयुष्यात खेळल्या जाणाऱ्या या पकडापकडीच्या खेळाने मला काय शिकवलं, हे आज मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतो —

आयुष्य पुरेपूर जगा, मनापासून जगा — पण प्रत्येक गोष्टीच्या पूर्ततेसाठी त्याचा नको तितका पाठलाग करू नका. जी गोष्ट तुमच्यासाठी निर्माण केली गेली आहे, ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल — यावर विश्वास ठेवा.

स्वप्न जरूर बघा, त्यासाठी मनापासून प्रयत्नही करा. ती पूर्ण झाली तर त्याचा मनमुराद आनंद घ्या — पण मिळालेलं सुख हे शाश्वत किंवा कायमस्वरूपी नाही, याचंही भान ठेवा.

जे काही मिळालं आहे, त्यासाठी कृतज्ञ रहा — कारण आज आपल्याला मिळालेलं हे आयुष्य, कदाचित दुसऱ्या कुणासाठी अजूनही फक्त एक स्वप्न असू शकतं. म्हणूनच इतरांच्याही स्वप्नपूर्तीसाठी मनापासून प्रार्थना करा.

आपली ओंजळ जर भरलेली असेल, तर त्यातला काहीसा भाग दुसऱ्याची ओंजळ भरण्यासाठी नक्की वापरा. अशाने तुमची ओंजळ जरी क्षणभर रिकामी झाली, तरी निसर्ग, ती दैवी शक्ती, तुमची ओंजळ पुन्हा नव्याने भरण्यास नक्कीच मदत करेल — हा माझा ठाम विश्वास आहे.

आयुष्यात काही गोष्टी सोडून देण्यातच खरं समाधान आणि कायमस्वरूपी सुख दडलेलं असतं. म्हणूनच काही घटना, काही प्रसंग, त्यांच्या आठवणी — त्या मोकळ्या मनाने सोडून द्यायला शिका.

आयुष्यातला हा पकडापकडीचा खेळ खरं तर खूप गमतीचा, खूप मजेशीर आहे — पण त्याचसोबत खूप काही शिकवणाराही आहे. म्हणूनच वाहत्या नदीला कधीही घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तिला तिच्या नैसर्गिक, सुलभ मार्गाने वाहू द्यायला शिका.

कारण एक दिवस हाच आयुष्याचा प्रवास एका विशाल महासागराला जाऊन मिळेल, आणि आपलं छोटंसं अस्तित्व त्या अथांग सागरात शांतपणे, समाधानाने सामावून जाईल.

धन्यवाद.

Tushar Karande

guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Sagar
Sagar
1 day ago

Waaawwaaaaa

Pooja Jaokar
Pooja Jaokar
Reply to  Sagar
1 day ago

Khupch chaan