![]()
नमस्कार मंडळी.
नवीन वर्षातला आज पहिला दिवस ; या नवीन दिवसाच आणि सुरू झालेल्या नवीन वर्षाच औचित्य साधून पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे याचा मला खूप आनंद आहे.खरतर कोणत्या विषयावर लिहावं? यावर माझं ठाम मत काही बनत नव्हतं…..पण अखेरीस एक विषय जो माझ्या स्वतःच्या जिव्हाळ्याचा आहे यावरच दोन शब्द उतरवण्याचा मी निर्णय घेतला. आशा करतो आपल्याला तो नक्की आवडेल.
दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर रुजू झालो आणि नेहमीच रूटीन म्हणजे सकाळची सात वाजून 20 मिनिटांची चर्चगेट लोकल पकडण्याची माझी लगबग चालू झाली. नेहमीप्रमाणे 7:20 लोकलमध्ये चढलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला बसायला दुसरी सीट मिळाली.कारण सहजच होत…दिवाळीच्या सुट्टीहून बरेच लोक अजून पुन्हा कामावर रुजू झाले नव्हते.दुसऱ्या सीटवर बसलो आणि डोळे बंद करून शांत बसून दिवसभराचा आढावा मनात गोळा करू लागलो.
पुढच्या स्थानकावर गाडी थांबली. लोक चढू आणि उतरू लागले आणि लोकलने वेग धरता मागून कुणीतरी ओरडले…….गेलं गेलं……पाकिट गेलं……..लोकांच गोंधळ सुरू झाला पण आता काहीच उपयोग नव्हता. पाकिट मारणारा ऑलरेडी फलाटावरून निघून गेला आणि ज्या व्यक्तीचं पाकीट गेलं तो ट्रेन मध्ये चढून झाल्यामुळे आतच राहिला.तो इसम माझ्या शेजारच्या बाकड्यावर येऊन बसला…पाकिट गेल्यामुळे तो बराच निराश आणि थोडा घाबरागोबरा. झालेला होता.आता नक्की काय करावं? या प्रश्नाचं वादळ त्याच्या डोक्यात घुमत असावं याचा आम्ही अंदाज बांधलाआणि इतक्यात एक आवाज आला…..तुम्ही भाग्यवान आहात,..
एक हाथ ….पाकिट गेलेल्या इसमाचा खांद्यावर ठेवून……आणखीन एक इसम बोलू लागला
खरतर..पाकिट गेल्यामुळे तो दुखावला गेलेला इसम आधीच कावराबावरा झाला असताना……तुम्ही भाग्यवान आहात.असे शब्द ऐकून तो आणखीनच चिडला.
रागाच्या भरात त्याने ते इसमाला प्रश्न केला पाकिट जाणं हे भाग्याचे लक्षण आहे का?पाकिटामध्ये माझे ₹2000. होते……..काही महत्त्वाची कागदपत्रे होती ….सर्व गेली आणि वरून तुम्ही मला भाग्यवान आहात असं म्हणता.तुम्हाला काय कळणार? माझ दुख ?
त्यावर तो दुसरा इसम बोलू लागला…..
तुमच्यासारखं पाकीट…नवे ब्रीफकेस…. दोन आठवड्यापूर्वी माझीही गेली.
त्यामध्ये माझा पासपोर्ट , आईच्या हॉस्पिटलचे पेपर , ₹15,000 ची कॅश, आणि काही घराची महत्त्वाची कागदपत्रे होती….सर्व गेल….या सगळ्या गोष्टी पुन्हा मिळवण्यासाठी आता पुन्हा मला प्रयत्न करावे लागणार आणि हे सर्व करण्यासाठी बराच खर्च पण होणार तो वेगळाच.माझ्या झालेल्या नुकसानापेक्षा तुमच नुकसान खूपच कमी आहे ….म्हणून म्हटलं तुम्ही भाग्यवान आहात.
हे सर्व ऐकल्यावर पाकिट गेलेल् थोडा सावरला आणि हळू आवाजात तो म्हणाला हो खरंच…माझ्या झालेल्या नुकसानापेक्षा तुमचं झालेलं नुकसान मोठं आहे….काळजी घ्या…रेल्वेतल वातावरण नॉर्मल झालं आणि ते दोघे इसम आपापल्या मार्गावर निघून गेले….
दिवस दुसरा…..वार, मंगळवार…..सकाळची 7:20 लोकल पकडली आणि पुन्हा बसायला जागा मिळाली या सुखाने मी निवांत झालो.
शेजारी 40-45 वर्षांचे एक गृहस्थ आपल्या मुलासह बसले होते.तो मुलगा थोडा अस्वस्थ वाटत होता.आता आपण डॉक्टरकडे गेल्यावर तुला नक्की बरं वाटेल…असं काही तरी ते त्या मुलाला वारंवार सांगत होते पण त्याचबरोबर ट्रेन जसजशी पुढे सरकत होती तसतशी वडिलांच्या चेहऱ्यावरची टेन्शन मात्र वाढत होती.अधूनमधून खिशातला रुमाल काढून डोळ्यातील पाणी टिपण्याचा प्रयत्न त्याचे वडील करत होते हे स्पष्ट दिसत होतं.
त्याची चलबिचल पाहून मलापण राहवेना म्हणून काहीतरी निमित्त काढून त्यांच्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार इतक्यात पुन्हा एक आवाज आला….तुम्ही भाग्यवान आहात….
अस कोण कोणास बोलत आहे? या विचाराने मी आणि ते वडील मागे वळून बघणार इतक्यात एक इसम , डोळ्यावरचा चष्मा सावरत पुढे आलाच् …त्या निराश असलेल्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला खरंच तुम्ही भाग्यवान आहात?
तो इसम आता आणखीन पुढे बोलू लागला….मला माफ करा.
तुमची माझी ओळख नाही.पण तुमच्या हातात असलेली हॉस्पिटलची फाईल, अस्वस्थ असलेला मुलगा, आणि आपल्या डोळ्यातील पाणी , याचे भाव टिपून मी अंदाज बांधला ….काहीतरी महत्त्वाच्या ट्रीटमेंटसाठी आपण हॉस्पिटल मध्ये जात असणार्….गेल्या वर्षी मी सुद्धा असाच माझ्या सहा वर्षांच्या मुलाला घेऊन आमच्या घराजवळच्या हॉस्पिटल मध्ये वारंवार जात होतो. डॉक्टर काय सांगतील या विवंचनेत कित्येक महिने अस्वस्थ होतो.आणि ज्याची भीती होती तेच झालं. माझ्या मुलाचे सर्व रिपोर्ट बघून … आता आपण काहीच करू शकत नाही.ऑलरेडी लेट झाला आहे…….xx हा आजार करोडो लोकांमध्ये एकाला होतो.आणि दुर्दैवाने आपला मुलगा यामधला एक आहे.डॉक्टरांनी हात टेकले , आम्ही हतबल झालो , आणि काही महिन्यातच, तो आम्हाला सोडून गेला.
आज या गोष्टीला सहा महिने झाले. कामाच्या व्यापात मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला.पण पत्नी अजूनही तो गेल्याच्या दुःखाचे सत्य विसरू शकली नाही.म्हणून तिची मानसिक स्थिती खालावत जात आहे.तिला कसं सावरू?या सत्याकडे कसं बघायला सांगू?या विचाराने माझे मनही स्थिर नाही.
तुमच्या मुलाकडे बघून तो नक्कीच स्ट्रॉंग आहे.नवीन औषध उपचाराने तो नक्की बरा होईल याचा मला विश्वास आहे.पुढच्या काही महिन्यात तो पूर्णपणे बरा होईल आणि पुन्हा तुमच कौटुंबिक आयुष्य सुरळीत होईल यावर मला विश्वास आहे. तुमची आताची परिस्थिती माझ्यापेक्षा नक्कीच चांगली आहे म्हणून म्हटलं तुम्ही भाग्यवान आहात…..माझ्या शब्दाने तुमचे मन दुखावले असेल तर मला क्षमा करा….
असे शब्द ऐकून त्या मुलांचे वडील खरंच सावरले, त्यांच्या मनाला नवीन उमेद प्राप्त झाल्यासारखे वाटले, आणि मनोमन आपली परिस्थिती बरी आहे या विचाराने ते वडील आणखीनच धीट आणि निर्धास्त मनाने त्यांच्या वाटेला निघून गेले.
कालचा आणि आजचा हा अनुभव प्रत्यक्ष बघून मीही थोडा चक्रावून गेलो.अशी कोणतीच परिस्थिती आपल्या वाट्याला आली नाही , म्हणून मी मनोमन परमेश्वराचे आभार मानू लागलो.
दिवस तिसरा….वार बुधवार…वेळ सकाळी 7:20 लोकल….
पंचविशीतला एक तरुण घाईघाईने ट्रेनमध्ये चढला….इकडे तिकडे बघून माझ्या समोरची सीट रिकामी आहे बघून चटकन बसला, घटाघटा पाणी प्यायला , त्याच्या हातात घड्याळ नव्हते, म्हणून पटकन मला विचारू लागला….दादा ट्रेन किती वेळात चर्चगेटला पोहोचेल? मला खरं तर 7:00 ट्रेन पकडायची होती…पण उशीर झाला.
मीही घडय़ाळाकडे पाहत त्याला बोललो … साधारण एका तासात म्हणजे 8:20 पर्यंत ती चर्चगेटला पोहोचेल.
तो तरुण उद्गारला बापरे….30 मिनिटे लेट
मी विचारलं , काय झालं?
तो सांगू लागला – आज माझा पहिलाच इंटरव्यु आहे. 8:00 वाजता रजिस्ट्रेशन वेळ दिली होती.आता 8:20 ला ट्रेन पोहोचणार म्हणजे नक्कीच सेंटरवर जाईपर्यंत साडेआठ होणार.रेजिस्ट्रेशनला आता घेतील की नाही या विचाराने कावराबावरा झाला.तोंडातल्या तोंडात कसलातरी जप करू लागला.इंटरव्युला काय प्रश्न विचारतील याची प्रत त्यांच्याकडे होती त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याचे लक्ष लागेना
त्याच्या या अवस्थेला मी जबाबदार नसलो तरीही मी काय करू शकतो याचा विचार करत होतो.
इतक्यात पुन्हा तोच आवाज…..तेच शब्द…..आमच्या दोघांच्या कानी पडले. तू भाग्यवान आहेस….
तरुणाने त्याचा पाठीमागच्या सीटवर बसलेल्या , आणि पाठमोर्या इसमाकडे मान वळून उद्गारला…..खरंच तू भाग्यवान आहेस.
अहो महाशय सकाळी सकाळी माझी अशी मस्करी करू नका?भाग्यवान या शब्दाचा आणि माझा दूर दूरचा संबंध नाही.तुम्हाला माझी परिस्थिती माहीत नाही.{काहींच्या चिडलेल्या स्वरात तो तरुण बोलत होता} मला वडील नाहीत.आई घरकाम करते. ती ने दिवस रात्र केलेल्या कष्टामुळे मी ग्रॅजुएट होऊ शकलो.मला एक लहान बहिण आहे.ती शाळेत शिकत आहे.परिस्थिती नसताना जिवाचे रान करून आई आम्हाला शिकवत आहे. आईचा हा कष्टाचा भार हलका करावा म्हणून ग्रॅज्युएशन नंतर आज पहिल्याच इंटरव्ह्यूला जात आहे. पण घरातून निघायला उशीर झाला.आता माहित नाही कंपनी मला इंटरव्यू अटेंड करायला देतील का?तसं नाही झालं तर पुन्हा नवीन जॉब मिळेपर्यंत आईला आणि कुटुंबाला पैशाची मदत करता येणार नाही.
त्यावर तो इसम पुन्हा बोलू लागला…..मी तुझी परिस्थिती समजू शकतो कारण या परिस्थितीतून मीही गेलो आहे.गेली सहा महिने मला जॉब नाही , घरात कमावणारं दुसरं कोणीच नाही , वडील आजारी असतात , त्यांच्या औषधपाण्याचा खर्च आहे , एक मुलगा, त्याची शाळेची फी , घराचा हप्ता , राशनपाणी , घरची इतर मासिक बिल…..या सर्वांची सांगड घालता घालता माझी नाकीनऊ येत आहे. साठवण केलेली पैशाची शिदोरी दोन महिन्यापूर्वीच संपली….एका बाजूला कर्जाचा डोंगर वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला दैनंदिन गरजा कशा पूर्ण करायच्या? याची सांगड घालणं मला आता फार फार कठीण जात आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यामुळे सहसा कोणी नवीन नोकरीसाठी विचारात घेत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये मी काय करावं?मला खरंच कळत नाही.
तू अजून तरुण आहे…लात मारशील तिकडे पाणी काढशील? तुझी पर्सनॅलिटी देखील छान आहे.चिंता करू नकोस तुला हा जॉब इन्टरव्ह्यू नक्की अटेंड करायला मिळेल.तुझ् सिलेक्शन होण्याइतका तू नक्कीच हुशार दिसतोस म्हणूनच तर त्यांनी तुझी निवड केली आहे , आणि देव न करो पण जर हा जॉब तुला मिळाला नाही तर इतर अनेक छोटे उद्योग करू शकतोस? कुठेही छोट्या पगाराची नोकरी तुला सहज मिळेल जेणे करून तुला तुझ्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता येईल.असा निराश होऊ नकोस , आयुष्याच्या सुरवातीला एवढा हतबल होऊ नकोस , अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
हे सर्व ऐकून तो तरुण खूपच सावरला आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स त्याच्या चेहऱ्यावर झळकला.
थॅंक यू काका अस म्हणून तो तरुण पुन्हा इन्टरव्ह्यू टिप्सवर लक्ष केंद्रित करू लागला.
या वेळेस मला मात्र सहन झाले नाही…सलग तीन दिवस…तीन गोष्टी बघतो आहे , आणि हां एक इसम त्या प्रत्येक गोष्टीवर वाच्यता करून निघून जातो काय या सर्वांचा मला आता त्रास होऊ लागला होता.या इसमाला गाठून त्यांना प्रश्न करायचा मला मोह झाला.हे सर्व खरे आहे की लोकांना फसवण्याचा मार्ग याचा जाब त्या इसमाला विचारण्याचा मी निर्णय घेतला.
चर्चगेट येण्याआधीच चर्नी रोड स्टेशनवर उतरण्यासाठी तो इसम सज्ज झाला.त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यासाठी मी उभा राहिलो.चर्नी रोड स्टेशनवर तो उतरला आणि ब्रिजच्या दिशेने चालू लागला. मीही त्याचा पाठलाग करत करत एका सावध क्षणी त्याच्या पाठीवर हात ठेवून मी उद्गारलो. …थांब
मागे वळून माझ्याकडे बघत , प्रश्नार्थक नजरेने तो ईसम माझ्याशी बोलू लागला…आपण माझ्याशी बोलत आहात?
मी : – हो तुम्ही…
ईसम :- बोला मी आपली काय सेवा करू शकतो?
मी :- सेवा नको , तुम्हाला काही विचारायचे आहे.
ईसम :- विचाराना.
मी :- गेले तीन दिवस …योगायोगाने आपण एकाच ट्रेनने…. एकाच डब्यात प्रवास करत आहोत , आणि मला जाणवले की जे लोक तुमच्या संपर्कात येतील त्यांना तुम्ही खोटे बोलत आहात.
ईसम :- खोट ? मी समजलो नाही.
मी :- तुम्ही भाग्यवान आहात. अस बोलून तुम्ही लोकांची दु खं आहेत , त्यावर आपलं दुःख किती मोठं आहे याचं चित्र मांडत आहात…..गेले तीन दिवस मी सुद्धा तुमच्या आजूबाजूला बसत आहे , त्यामुळे तुम्ही इतर लोकांशी केलेला संवाद माझा पर्यंत विनासहाय्यास माझ्या कानी पडत होता.
तुम्ही सांगितलेले ते तीन्ही संवाद आणि तुमचे अनुभव कुठे तरी मला खटकू लागले आहेत कारण प्रत्येक वेळेस तुम्ही समोरच्या माणसाचे दुःख ऐकून आपण आपले दुःख किती मोठआहे याचाच पाढा वाचत आहात. .हे कितपत खरे आहे हे मला जाणून घ्यायचे आहे.उद्या जर मी तुम्हाला माझी दुखती नस दाखवली तर त्यावर तुमच्याकडे पण काहीतरी मोठी दुखती नस आहे असा दाखवायला तुम्ही कमी करणार नाही , त्याची मला आता खात्री पटली आहे.लोकांच्या भावनांशी तुम्ही असे का करता? त्यांना खोटी आशा का दाखवता. तुम्हाला काय आनंद मिळतो या सर्वातून?
माझ्या सर्व राग , त्रस्त चेहरा बघून, माझं म्हणणं पूर्ण होईपर्यंत तो शांत होता. माझ् बोलून झाल्यावर , तुमची इच्छा असेल तर मी आता बोलू का?
मी रागाने म्हटले ….हो बोल…
त्यानंतर त्याने बोलण्यास सुरुवात केली , त्याने सर्वात आधी मला प्रश्न केला.
मला खरं सागा….तुमच्यासाठी सुख म्हणजे नक्की काय असतं?
किंवा तुमच्यासाठी सुखाची व्याख्या काय आहे? दोन घटका शांत बसून मीही या प्रश्नाकडे मन लावून विचार करत बसलो , पण हवे असे उत्तर त्याला देऊ शकलो नाही.
यावर तो पुन्हा बोलू लागला….बघा नाही ना सांगत आले?
आता तुम्हाला सांगत असलेली गोष्ट तुम्हाला किती पटेल हे मला माहित नाही , पण तुमचा इतका आग्रह आहे म्हणूनच सांगतो.
आपण सर्व मानव कोणत्या ना कोणत्या तरी कारणांनी सुखी किंवा दु खी होत असतो , आपल्या सर्वांसाठी सुखाची आणि दु:खाची व्याख्या, त्याचे अनुभव नक्कीच वेगवेगळे असणार्.आपलं खरं सुख कशात आहे याचा आपण शांतपणे विचार करतो का? जे क्षणिक आहे , तेच मिळवण्यासाठी आपण आपल अख्खा आयुष्य पणाला लावत असतो.
माणसाने स्वप्न बघावीत….ते पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावेत , पण त्या सर्व स्वप्नांना स्वतःच्या आयुष्याशी बांधून ठेवता कामा नये.
कारण स्वप्न पूर्ण झाली नाही तर त्याचं दुःख खूप मोठं असतं.आणि मग हे दुःख पचवायला आपल्याला जड जातं…..सहन होत नाही…..आणि हरलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण धजावत नाही.….
म्हणजे काय…. जे सुख क्षणिक आहे त्याच्या मागे धावता धावता आपल अर्ध्याहून अधिक आयुष्य खर्ची पडत….आयुष्याच्या उत्तरार्धात हे जाणवतं कि क्षणिक सुखाचा पाठलाग करताना आपण जे शाश्वत सुख आहे, जे आपल्या वाट्याला ऑलरेडी आहे , त्याच्याकडे आपण दूर्लक्ष केलेल आहे….पाठ फिरवलेली आहे…
मग काय? तेल गेलं आणि तूपही गेलं ..हाती राहील धुपाटणेअशी गत होते.
दुःखाचही असच आहे….प्रत्येक दुःख , प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याच वाटय़ाला का? हा कायम मुक्कामाला आला आहे का ? या विचाराने माणूस निराश होतो. शरीराने, मनाने, विचाराने, आलेल्या दुःखाला किंवा प्रसंगाला सामोरे जाण्यास नाकारतो …
पण त्याच क्षणी जर कोणी त्याला आपल्यापेक्षा जास्त दुःखी माणूस असेल , तर थोडेसे हायसे वाटते. आपले दुःख इतरांच्या दु खापेक्षा कमी आहे , आपली परिस्थिती समोरच्यापेक्षा नक्कीच बरी आहे या विचाराने व्यक्ती मनाने हळुवारपणे सुखावून जातो. त्याला नकळत का होईना पण मानसिक बळ मिळाल्यासारखं वाटत , आणि समोर असलेल्या परिस्थितीशी सामना करण्यास तो सज्ज होतो.
तुम्ही भाग्यवान आहात…. हे शब्द दुःखात जेवढे बळ देऊन जातात तेवढे नक्कीच साधारण परिस्थितीत काम करत नाही.आणि म्हणूनच हे मानसिक बल लोकांना देण्यासाठी मी लोकांशी संवाद साधतो.
जेव्हा लोकांना जाणवत कि त्त्यांच्या वाट्याला आलेले दुःख हे माझ्या दुःखापेक्षा कमी आहे , ते मनोमन सुखावतात.
काहीतरी पाठबळ असल्याच त्यांना जाणवतं आणि मग ते हसत मुखाने , अधिक धैर्याने , असलेल्या परिस्थितीला सामोरे जाताना मला दिसतात.यातच मला खरा आनंद मिळतो. सुख मिळते.
कुणाच्या तरी दु खावर , कठीण प्रसंगावर आर्थिक मदत केली तर ती त्यांना त्या वेळेपुरतीच कदाचित उपयोगी ठरू शकेल , किंवा तसं केलं तर ते कदाचित आणखी दुखावली जाऊ शकतात , पण मी वापरलेल्या त्या शब्दांच्या मदतीने त्याच काहीच नुकसान होत नाही.
त्यांना किंवा मला कोणत्याच गोष्टीची अपेक्षा राहत नाही.आणि आम्ही दोघे आपापल्या कामाला मोकळे होऊन जातो.
लोकांच्या दु खावर आपल्या शब्दांची फुंकर घालून त्यातून मिळालेलं सुख माझ्या वाटय़ाला येत आणि स्वतःचे दुःख आपल्याच अंगावर पेलण्याची ताकद त्यांना मिळते आणि त्यात तेही बर् यापैकी सुखावून ज़ातात.
गेले तीन दिवस तुम्ही ऐकलेले माझे अनुभव किंवा मी सांगितलेली प्रत्येक घटना यातलं काहीच खरे नाही. पण लोकांना मिळालेला दिलासा , पाठबळ , मनोबल हे सर्व खरे आहे.आणि हेच माझ्यासाठी माझं खर सुख आहे.
तुम्हाला एक विनंती आहे जर यापुढे कधी पुन्हा आपली भेट झाली तर मी सांगत असलेला अनुभव खोटा आहे अस कृपया चारचौघात सांगू नका? अशाने तो किंवा ती व्यक्ती आणखी दुखावला जाण्याची शक्यता मला वाटते आणि मला ते नकोय.
असे बोलून त्याने माझ्यापुढे त्याचे दोन्ही हात जोडले आणि हसऱ्या चेहऱ्याने पुढे निघून गेला.
तो अजब व्यक्ती इथून पुढे कुठे जातो हे पहाण्यासाठी मी पुन्हा हळूवारपणे त्याचा पाठलाग करू लागलो आणि पाहतो तो काय?
स्चर्नी रोड स्टेशनचा बाहेर , एका चहा टपरीजवळ एक भलीमोठी मर्सिडीज कार उभी होती.तो इसम जवळ येत आहे असे पाहताच त्या गाडीचा ड्रायव्हर त्या गाडीतून बाहेर आला. हळुवारपणे गाडीचा मागचा दरवाजा त्याने उघडला, गाडीत बसण्यापूर्वी त्या इसमाने त्याच्या ड्राइवरला एक स्मितहास्य करून त्याच्या पाठीवर थाप मारून.. चलो चलते हे ..अस म्हणून तो आत बसला.गाडी वार्याच्या वेगाने दूरवर निघून गेली.
हे सर्व दृष्य बघून मी स्तब्ध झालो. या सर्व परिस्थितीच चक्रीवादळ मात्र माझ्या डोक्यामध्ये घुमू लागले. कोपऱ्यावर असलेल्या चहाच्या टपरीवरून चहा घेतला.
चहाचा घोट घेता घेता मी डोक्यात असलेले चक्रीवादळ शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो आणि आपसूकच.बर् याच प्रश्नांची उत्तरं मला मिळत गेली..
मर्सिडिज गाडी मध्ये बसून प्रवास करणार्या या धनाढ्य व्यक्तीला काय गरज असावी लोकलने प्रवास करून सर्वसामान्य लोकांना दोन शब्दाचा दिलासा देण्याची? खर तर तो व्यक्ती इतरांना हवी तेवढी पैशाची मदत करू शकला असता पण त्याने ते न करता फक्त शब्दांच्या जोरावर लोकांना जे मानसिक समाधान दिलं ते पैशांच्या मदतीपेक्षा मोठ होत का?
जगातली सगळी सुख ही फक्त पैशावरच अवलंबून असतात का?किंवा पैशाने विकत घेतली जाऊ शकतात का? याचं उत्तर जर नाही असेल तर जगातले 90 टक्के लोकं पैशाच्या मागे किंवा त्यातून मिळणार्या सुखाच्या मागे का बर धावत असतील?
मनुष्याचा खर सुख हे भौतिक गोष्टी मध्ये नसून ….आत्मिक सुख हेच खरं शाश्वत सुख आहे , म्हणूनच जगातली प्रत्येक भौतिक सुख हे मिळालंच पाहिजे याचा हव्यास माणसाने नक्कीच करू नये.
खरया सुखाची व्याख्या एकच असू शकते ति म्हणजे दुसऱ्याला सुखी करणे किंवा सुखी पहाण
जगात कोणतीही घटना , कसलीही परिस्थिती कायम स्वरुपी नसते , बदल हा निसर्गाचा नियम आहे , म्हणून सुखात जास्त भारावून जाऊ नये , आणि दुःखात खचून जाऊ नये.
हे ही दिवस निघून जाणार् आहेत या एका सत्याचा ठसा आपण मनामध्यें कोरून ठेवला तर सुख आणि दुःख यामध्ये फारसा फरक लोकांना जाणवणार नाही आणि दोन्ही परिस्थितीमध्ये आपण आपला संयम आणि भान ठेवून वागू शकू
जे घडतं ते चांगल्यासाठीच . जि दैवी शक्ती आपल्याला जन्माला घालते तिच शक्ती आपल्या दाणा पाण्याची सुद्धा सोय नक्कीच करून ठेवते
खोटं बोलणं पाप आहे पण जर खोटं बोलण्याने कुणाचे नुकसान होत नसेल , कोणीही दुखावला जात नसेल तर ते खोटं पाप ठरत नाही.
आयुष्यात जे मिळत आहे , त्यातच सुख मानून जे नाही त्याचा विचार आपण करू नये आणि जे मिळत आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं खूप गरजेचं आहे.
जाता जाता …..प्रशांत दामलेंच्या नाटकातल्या त्या दोन ओळी खरंच खूप समर्पक आहेत याची जाणीव मला झाली…..त्या ओळी म्हणजे………
मला सागा.…….सुख म्हणजे नक्की काय असतं?
काय पुण्य असते की जे?घरबसल्या मिळत………………..
धन्यवाद
तुषार कारंडे









