नमस्कार मंडळी.
वेळ संध्याकाळी 6:15 मिनिटे.
मोबाईलची रिंग वाजली , बघतो तर मित्राचा कॉल….या कॉलने मला एक प्रकारचा रिमाइंडर मिळाला की आता सहा वाजून गेले आहेत , लॅपटॉप रुपी दुकान बंद करण्याची वेळ….म्हणून लगेचच लॅपटॉपवरचं SHUT DOWN बटन दाबल आणि लगेच कॉल उचलला.
समोरून मित्र – “अरे काय करतोयस इतका वेळ अजून?? डेस्कवरच आहेस का? ये लवकर पार्किंग लॉटमध्ये तुझी वाट बघतो आहे , असा मित्राचा निरोप कानावर पडताच….
पुढचा चौथ्या मिनिटात मी गाडीजवळ आहे असं बोलून , कॉल कट करून , बॅग आवरून लिफ्टच्या दिशेने निघालो.आणि दिलया वचनाप्रमाणे exactly चौथ्या मिनिटाल मी माझा मित्रासोबत त्याच्या कारमधून घरी जाण्या सज्ज झालो होतो.
ऑफिसला येताना मी ट्रेन प्रिफर करतो , पण ऑफिसच्या कामामुळे इतका कंटाळा येतो की , संध्याकाळी पुन्हा ट्रेनचे धक्के खात घरी जाण्यापेक्षा मित्राने “घरी सोडतो” ही दिलेली ऑफर नेहमीच पसंत करतो अशाने आम्हा दोघांनाही तेवढीच सोबत.
ऑफिस ते घर म्हणजे विक्रोळी – ठाणे….अंतर जेमतेम 40 मिनिट पण ट्रॅफिक लागला तर काही नेम नाही…Luckily त्यादिवशी नेमकं शनिवार होता…रस्त्यावर नेहमीपेक्षा जरा कमी ट्रॅफिक होती. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून आम्ही चाललो होतो.
“जिंदगी एक सफर है सुहाना ………. यहा कल क्या हो, किसने जाना”
या गाण्याचा हळूवार आवाज कानावर पडत होता. अर्थात रेडियो एफएम वर…गाणी एकता, एकता आणि ऑफिसमधल्या unofficial गोष्टींचं gossiping करता करता आमचा प्रवास साधारण ताशी 100 किलोमीटर प्रतिवेगाने चालू होता.
गप्पांच्या नादात मित्राने गाडीला अचानक कच करून ब्रेक मारला….आणि अक्षरशः आता आमचे डोके आपटणार या बेतात आणि स्वतःला सावरत कशीबशी आमची गाडी थांबली.
मी पुरता भीतरलो होतो..
अरे वेडा आहेस का? गाडी का थांबवली? असा रागयुक्त पण काहीसा भीतीयुक्त प्रश्न मी मित्राला केला.
त्याला वाटलं गाडी अचानक थांबवण्याच कारण मला कळल असेल म्हणून सुरुवातीची काही सेकंद तो शांत होता.
पणे नंतर माझा चेहरा बघून त्याने झटकन मला गाडीच्या समोर असलेल्या एका खांबाकडे बोट करून मनाला , समोर बग काय आहे ते? मी ही चटकन समोर पहिल , तर अर्थात तो खांब म्हणजे लाल रंगाचा निर्देश देणारा ट्रॅफिक सिग्नल होता.
तो बघता मी ही जरा शांत झालो कारण तो लाल रंग दिसला म्हणजे नियमाने आम्हाला आमची गाडी थांबवणे भागच होते. आणि आम्ही तसे केले नसते तर नक्कीच पुढे हवलदार मामाना भेट देऊन काही ना काही तरी भुरदंड आम्हाला भरावा लागला असता…
90 सेकंड संपले , आणि एकदाचा हिरवा सिग्नल आम्हाला मिळाला आणि आमची गाडी हळुवारपणे पुढे सरकत पुन्हा हायवे ला लागली.आधीचा बसलेला झटक्यातून मी काही नीटसा सावरलेलो नव्हतो….आणि म्हणूनच मित्राला ठणकावून बजावले , की ड्राइविंगकडे नीट लक्ष दे . अर्थात हे सिग्नलरूपी बाबा आपल्याला आधीच पिवळा रंगाचा झेंडा दाखवून अलर्ट देत असतात की तुमच्या गाडीचा वेग कमी करा कारण तुम्हाला आता थांबायचे आहे , पण त्याकडे कोणी फारसे लक्ष देत असेल असे मला वाटत नाही.
माझ्या बोलण्याकडे मित्राने जास्त लक्ष दिले नसावे , कारण तो ऑलरेडी कार चालवण्यात एक्सपर्ट होता , एवढ्यात माझ्या सोसायटीच्या गेटसमोर कार थांबवून सोमवारी भेटू , असं बोलून तो पुढे त्याच्या घरी निघून गेला.
घरी आल्यावर पाय धुऊन , खिडकीत बसून होतो. खरंतर आज झालेल्या प्रकाराची धडकी मनात कायम होती , आणि तिला पूर्वपदावर यायला थोडा वेळ लागणार होता , म्हणून आज शांत राहण्याचा निर्णय घेतला.
त्या ट्रॅफिक लाइट्सचा तीन छटानी माझ्या मनातसुद्धा एक प्रकारचा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला , आणि हे तीन रंग आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहे याचा पुसटसा अंदाज मला येऊ लागला.
आता बघा ना माणसाचं आयुष्य हे सुद्धा ट्रॅफिक लाइट्सचा हुकुमावर चालावं असं चालत असतं , धावत असत आणि काही क्षणी थांबतही असतं.
कुणी शोध लावला असेल या ट्रॅफिक लाइट्सचा? त्यात निवडलेल्या रंगांचा आणि त्यातून दर्शवला जाणार्या निदर्शनांचा.
असे ट्रॅफिक लाइटचे हे तीन रंग फक्त भारतातच नाही तर जगाच्या कोणत्याही भूतलावर जा त्याचा रंग , त्याचे नियम हे सर्वांना सारखेच असतात.
- लाल – थांबा [ Stop – Dont Move]
- पिवळा – वेग कमी करा [ Slow Down Speed]
- हिरवा – पुढें चला [ Go Ahead]
असे हे ट्रॅफिक लाइट्स आणि त्याचे रंग..….फक्त रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांना मार्गदर्शन करत नसून ,
कुठेतरी आपणा मानवांच्या आयुष्यात सुद्धा सारखेच मार्गदर्शन घडवत असतात , अस बोललो तर वावगे ठरणार नाही.
काय शिकवण देत असतील हे ट्रॅफिक लाइट्स? मला विचाराल तर माझा दृष्टिकोन काहीसा असा आहे.
आयुष्य म्हणजे एकप्रकारचा प्रवास आहे. जो करत असताना आपल्याला अनेक सुख-दुःख , चांगल्या वाईट अनुभवांची शिदोरी पदोपदी घ्यावी द्लागते , त्याशिवाय हा प्रवास सुखकर होत नाही.
आपण असे धरून चालू की या आयुष्यरूपी रस्त्यावरून चालताना येणारे गतिरोधक म्हणजे छोट्या छोट्या अडचणी , रस्त्यावरचे खड्डे म्हणजे आलेल्या छोट्या मोठ्या दु खाचा अनुभव , ओबड धोबड रस्ता म्हणजे खडतर परिश्रम आणि रस्ता चालताना चुकलेली वाट म्हणजे आपल्या हातून नकळत झालेल्या चुकां.
पण या सर्वांचा अनुभव घेत जेव्हा मनुष्य नावाचा प्राणी हा त्याच्या वेगाने त्याचा प्रवास चालू ठेवतो तेव्हा त्याला कुठेतरी , कधीतरी सरळमार्गी , स्वच्छ असा मार्ग नक्की वाट्याला येतो यात शंका नाही.
अशा या जीवनरूपी प्रवासात ,किंवा मी म्हणेन….या टेक्नोसॅव्ही जगात प्रत्येक जण धावतोच आहे प्रत्येकाला पहिल्या क्रमांकावरच पोहोचायचे आहे. पण ते कितपत योग्य आहे? प्रत्येकाने पहिल्या क्रमांकावर आलेच पाहिजे ,हीच काळाची गरज ठरली आहे का?माझ्यामते तरी नाही.
ट्रॅफिक सिग्नलच्या या तीन रंगांचा अर्थ माझायोगे तर काहीसा असा आहे ,बघा तुम्हाला पटतो का?
- लाल रंग………थांबा [ Stop – Dont Move]
मनुष्यरूपी प्राणी भौतिक सुखाच्या हव्यासापोटी ,आपल्या कर्तव्यासाठी , किंवा बहुधा स्वतःच्या स्वार्थासाठी इतका धावतो आहे कीं ते धावताना आपण बरंच काही मागे टाकून जात आहोंत याची त्यांना कल्पनादेखील होत नाही.अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाने , आपण कुठेतरी थांबल पाहिजे. ….मिळालेल्या गोष्टींचा आनंद – सुख घेता घेता त्याचा सदुपयोग इतरांना सुद्धा करता आला पाहिजे याची जाणीव होण्याची गरज आज सर्वांनाच आहे.
आपण मिळवत असलेली भौतिक सुख काही शाश्वत सुख नाही किंवा चिरकाळ टिकणारे नाही , त्यामुळे या सर्व गोष्टींचा हव्यास आणि काही मर्यादा ठेवणं याची आज गरज बनून राहिलेली आहे.
कोणतीही मेहनत करताना किंवा तुमचे उद्दिष्ट साध्य करताना तुमची शारीरिक, मानसिक, बौद्धिक दमछाक होत असेल तर जरा थांबा , थोडी विश्रांती घ्या आणि मग पुढे चला.
पूरेपूर मेहनत करून देखील हवे ते उद्दिष्ट साध्य होत नसेल तर निराश होऊ नका , तिथे थोडी विश्रांती घ्या.कारण प्रत्येक गोष्ट पूर्ण होण्याची एक ठराविक वेळ असते…
अशा या भौतिक सुखाच्या हव्यासापोटी , धावता धावता नियती कधी आपल्या हृदयाच्या ठोक्यात्ला कचकन ब्रेक लावेल हे कोणीच सांगू शकत नाही…म्हणून असेल त्या परिस्थितीत सुख मानून आनंदित राहण्यातच खरे जीवन आहे.
योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबले पाहिजे. ..असा संदेश मला या लाल रंगात मिळत जातो.
- पिवळा- वेग कमी करा [ Slow Down Speed]
कर्म करण्याच स्वतंत्र माणसाला मिळाला आहे आणि त्याने ते कोणत्याही परिस्थितीत केलच पाहिजे.पण ते करत असताना त्याची गती काय असावी हे ज्याचे त्याने ठरवले पाहिजे.
सुखांत दिवस जगत असताना , आता माझ्याकडे सर्व आहे आणि आता मला काही करायची गरज नाही असे बोलून हातावर हात मारून बसणे हे अयोग्य आहे . धीम्या गतीने का होईना मनुष्याने कोणते ना कोणते कर्म करतच राहिले पाहिजे.
आयुष्यातली सर्व सुख मिळवत असताना आपली दमछाक होते आणि त्याचे चुकीचे पडसाद आपल्या शरीरावर उमटू नयेत म्हणून आपल्या मेहनतीचा वेग जरा कमी करून आपली वाटचाल कायम ठेवणे नेहमीच चांगले आहे असे मला वाटते.
अशा वेळेस मला ससा आणि कासव या गोष्टीसे उदाहरण घ्यायला नक्की आवडेल.
बघाना , कोणतेही ध्येय गाठण्यासाठी सशासारखी धाव घेऊन स्वतःची दमछाक करून हार पत्करण्यापेक्षा ,
कासवा सारखे मंद मंद पावले टाकीत , आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे ही शिकवण आपण लहानपणापासूनच या गोष्टीतून घेत आलो आहोत….आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कदाचित थोडा वेळ लागेल पण आपण त्यामध्ये विजयी नक्कीच होउ यात शंका नाही.
“वन स्टेप ऍट टाइम” [एका वेळी एकच पाउल.] , या तत्त्वावर राहून आपले स्वप्न , आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा हा एक साधा सरळ राजमार्ग आहे असं मला मनापासून वाटतं
म्हणूनच पिवळा हा रंग माझ्यासाठी तरी खूप महत्वाचा आहे…आणि खूप मोठी शिकवण देणारा आहे.
- हिरवा – पुढें चला [ Go Ahead]
या रंगाचा आढावा घेता या रंगाने जरी आपल्याला पुढे चालत रहा अशी आज्ञादिली तरी त्या क्षणापासून पुढचा टप्पा गाठेपर्यंत आपला स्वतःचा किती वेग असावा हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून असतं.
अशा परिस्थितीमध्ये समोरचा माणूस जसा चालतो , धावतो , याचे अनुकरण न करता ,स्वतःचा कॅपेबिलिटीप्रमाणे [क्षमता], लिमिटप्रमाणे आपण आपला वेग निश्चित करावाअसं पर्सनली मला वाटतं.
जर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी , अमुक एक दिवस , तास किंवा वर्षे लागत असतील तर तेवढाच कालावधी मला माझी काम पूर्ण करण्यासाठी लागला पाहिजे, अशी अपेक्षा करणं चुकीच आहे.
त्यामुळे आयुष्यात जीवनरुपी प्रवासाची वाटचाल करताना आपला वेग काय असावा हे ज्याच त्याने ठरवाव , आणि त्याप्रमाणे आपल्या गोष्टींचे नियोजन करून आपली वाटचाल चालू करावी.
आयुष्यात कितीही संकटं आली तरी खचून न जाता…वेळ आली तर थोडस थांबून , स्वतःचा वेग कमी करून, योग्य वेळी आली की पुन्हा वाटचाल चालू करण यातच खरी मजा आहे.
ट्रॅफिक लाइटचे नियम तोडल्यास त्याची शिक्षा या ना त्या मार्गाने आपल्याला भोगावीच लागते.
त्याचप्रमाणे जीवनाचा या प्रवासात कोणासही , कोणतेही नुकसान केल्यास त्याचा भुर्दंड किंवा त्याची नुकसान भरपाई कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने करावीच लागते हा निसर्गाचा नियम आहे हे कायम लक्षात ठेवा.
त्यामुळे मानव निर्मित ट्रॅफिक लाइटचे नियम तर तुम्ही पाळत असाल अशी आशा करतो , पण जीवनरुपी हा प्रवास करताना या तीन रंगाची प्रतिमा , त्याचा संदेश आपल्या हृदयामध्ये कायम जपून ठेवा म्हणजे तुमचा जीवन प्रवास नक्कीच सुखकर आणि विनासायास होईल अशी आशा करतो.
धन्यवाद.
Tushar K