The Positive Diary

"माझ्यातला मी..."

Loading

नमस्कार मंडळी

वार शनिवार ,  सायंकाळी साधारण सात वाजताची वेळ. अचानक मोबाइल खणाणला. नंबर सेव्ह नसल्याने डिस्प्लेवर एक अनोळखी नंबर चमकू लागला.नवीन नंबर बघून मीही काहीसा दचकलो…..आणि कोणाचा फोन असावा यासाठी उत्सुकतेने आणि घाईघाईत तो येणारा कॉल मी रिसीव केला. समोरून एक भारदस्त आवाज आला…काय रे तुसू…कसा आहे?नवीन वर्षाची पार्टी करून अजून बेडवर लोळत पडला आहेस का?चल ऊठ भेटायचं आहे आपल्याला. उद्या रविवार सायंकाळी ठीक 7:00 वाजता शिवाजी पार्कात.बाकी सर्वजण पण यायला तयार आहेत.तू पण ये न विसरता.वाट बघतो़य तुझी.

आपण कोण बोलत आहात हे विचारण्याआधीच त्या व्यक्तीने वर नमूद केलेला फरमाना अगदी एका श्वासात बोलून पूर्ण केला. त्याचं बोलणं झाल्यावर मीच एक दीर्घ श्वास घेतला आणि थोडय़ा आश्चर्याने विचारलं.कोण बोलत आहे?आणि माझं तुषार या नावाचं नामकरण तुसू कधी झालं? यानावाने मला फक्त माझे शाळेचे वर्गमित्र बोलावतात , याचं भान मी त्याला करून दिल. त्यावर समोरून लगेचच उत्तर आलं.अर्थातच मी तुझा वर्गमित्र- बालमित्र अभिषेक.ओळखत नाहीस का?

मग माझ ही उत्तर , कसं ओळखणार? एकतर तू शाळेचा वॉट्सॲप ग्रुपवर नाहीस……….. फेसबुकवर किंवा अन्य कोणत्याही सोशल मीडियावर तुझा वावर नाही. शेवटच आपण कधी बोललो असेल तेही मला आठवत नाही आणि तुझा कोणताही कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे नसल्याने एका अचानक कॉलद्वारे मी तुला कसओळखणार? 

असो…. ओळख पटण्याची शहानिशा आणि औपचारिकता आटोपल्यावर आम्ही मेन मुद्या वर आलो की रविवारी 1 जानेवारी 2023 या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शाळेतील मित्रांसह रीयूनियन करायचं ठरलं.आणि हे रियुनियन खास त्या लोकांसाठी जे लोग मैत्रीच्या यादीतून बेपत्ता झाली आहेत..

उद्याचं औचित्य साधून सर्व पुन्हा भेटणार होते.अर्थातच शाळेतल्या जुन्या आठवणींची उजळणी करायला मिळणार होती म्हणून क्षणाचाही विलंब न करता मी त्यांना भेटण्याचं ठरवलं.आणि मग काय,  ठरल्याप्रमाण , ठरल्यावेळी , ठरल्याठिकाणी आमची महफिल जमली.फरक फक्त इतकाच लहानपणी अशी महफिल एकाच वर्गात बाकावर जमायची ,  आता ती शिवाजी पार्कच्या कट्टय़ावर जमली होती..सर्वांना इतक्या वर्षांनी भेटून खरंच खूप आनंद झाला.प्रत्येकाची शरीरयष्टी थोड्याबहुत प्रमाणात बदलेली. प्रत्येकजण आपआपल्या आठवणींना उजाळा देत होता. शाळा सोडल्यानंतर ते आजतागायत जे जे कोणी ज्या ज्या ठिकाणी आहेत , जा पदावर किंवा जीवनाचा  , करियरचा जा वाटेवर येऊन पोचले आहेत  त्याची बाकी- वजाबाकी याची गणित एकमेकांसोबत शेअर केली जात होती.

मी फक्त दोन्ही कान मोठे करून जास्तीत जास्त गोष्टी ग्रहण करण्याचा प्रयत्न करत होतो.एवढे सगळे अनुभवाचे डोस माझ्या कानावर पडत असताना काहीसा एकसूत्रीपणा मला त्या सगळ्या अनुभवातून जाणवला.

तो कोणता बर.?

प्रत्येकजण स्वतःचे अनुभव शेअर करताना एक शब्द कायम वापरत होता. आणि तो म्हणजे “मी”.

 

  • मी खूप संघर्ष केला.मी योग्य वेळी घराबाहेर पडून शिक्षणाचा निर्णय घेतला नसता तर कदाचित आज चित्र काहीसे वेगळे असत.
  • मी एकटाच माझा कुटुंबाचा सांभाळ करत आहे. मला कोणाची साथ नाही. ना भाऊ ना बहिण , कोणाचीच मदत मला कधीच होत नाही.
  • मी एकटीने माझा बिझनेस उभा केला आहे आणि तो खूप छान चालला आहे. 
  • मी त्या अमुकतमुक इसमाला योग्य वेळी मदत केली नसती तर त्याच काही खर नव्हत
  • मी माझी स्वप्न बाजूला ठेवून माझ्या कुटुंबासाठी हा हा त्याग केला म्हणूनच माझा भाऊ-बहिण आज चांगल जीवन जगत आहे. पण आता मला कोण विचारत नाही.
  • मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर माझ विश्व निर्माण केले आणि त्याचा मला खूप अभिमान आहे.

या आणि अशा बर्याच गोष्टी…………………..

या सर्वांमध्ये मला एकच गोष्ट कॉमन जाणवली आणि ती म्हणजे त्यांचा त्यांच्यात दडलेला “मी” पणा….….काहीसा कळत किंवा काहीसा नकळत.

कदाचित हा “मी” पणा त्यांच्यातला अभिमान असू शकतो किंवा गर्व किंवा त्यांनी केलेल्या चांगल्या कर्माचे क्रेडिट स्वतःकडे घेण्याचा एक मानसिक स्थायीभाव. हे नक्की काय असू शकते याचा अंदाज मला बांधता येईना.

सर्व मित्रांसोबत निरोप समारंभ झाल्यानंतर घरी आलो आणि खरतर खूप विचारात पडलो.

माझ्या मनात फक्त एकच प्रश्न उमटत होता तो म्हणजे— 

“कुठुन येत असेल हा “मी” पणा आपल्यामध्ये?? कळत – नकळत की जाणूनबुजून?.. 

इतरांचा स्वभावामध्ये.. नजर टाकण्याआधी जर मी स्वतःच्या वागणुकीकडे अंतर्मुख होऊन डोकावले तर हे जाणवते की या सत्याला मीही अपवाद अजिबात नाही.कारण असा हा “मी” पणा कुठेतरी माझ्यामध्ये सुद्धा सुप्तावस्थेत  दडलेला आहे.दिवसातून किती वेळा आपण हा मी चा पाढा गिरवत असतो.कधी अंतर्गत मनाशी हितगुज करताना.[आपल्या विचारात]  किंवा इतरांशी संवाद साधताना , 

आणि असं दडलंय तरी काय? या एका “मी” शब्दामध्ये.

 

तुम्ही कधी विचार केलाय का?

  • आपला जन्म घेण्याचा दिवस आणि मृत्यूचा दिवस या दोन महत्त्वाचा दिवसाची निवड करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे का? नक्कीच नाही.
  • आपण घेत असलेला प्रत्येक श्वास जो आता आहे पण दुसरा क्षणाला कदाचित नसेलही.कोण निर्माण करत असेल?
  • आपण जेवलेलं अन्न एकदा का घशातून पोटातील गाभार्यात गेलं ,  तर ते पचव्यण्याची क्रिया आपण स्वतः करतो का?
  • आपण झोपलेलो असतानादेखील आपला श्वास हा अविरतपणे चालूच असतो.आणि म्हणूनच की काय आपण जीवंत आहोत याची पावती आपण इतरांना देत असतो ,  हे कोण करत असेल?
  • एका स्त्रीच्या गर्भात जेव्हा एकजीव आकार घेत असतो तेव्हा त्याची सर्व शरीर रचना कोण घडवत असेल?

या सर्व प्रश्नांची उत्तरं “मी” करतो असं कुणीही मान्य करणार नाही. कारण हे सर्व घडत असतं एका अज्ञात शक्तीमुळे.

जाला काही आस्तिक लोक परमेश्वर म्हणून ओळखत असतील,  तर काही लोक निसर्गाचा नियम.

नास्तिक लोक या सर्वांना विज्ञानाची किमया असा टॅग लावून मोकळे होत असतील.

पण सत्य तर हेच आहे – की जीवनाची सुरुवात आणि शेवट हे दोन बिंदू जर मी नावाचा प्राणी ठरवत नसेल , तर या दोन बिंदूंमध्ये असलेल आयुष्य आणि त्यात घडत असलेला प्रत्येक चांगल्या गोष्टीचं क्रेडिट आपण मी केल या नावावर का घेतो? 

“मी” या नावाचे लेबल लावून कोणता अहंकार जपण्याचा आपण प्रयत्न करत असतो? 

या अशा पडलेला प्रश्नाकडे बघण्याचा माझा  दृष्टिकोन आता काहीसा बदलत चालला आहे कारण याचं उत्तर मला आपल्या धर्मग्रंथामध्ये म्हणजे भगवद्गीतेमध्ये सापडलेल आहे. 

  • परमेश्वराने कर्म करण्याचे स्वातंत्र्य मानवाला दिल आहे. पण त्यातून निष्पन्न होणारी फळे यावर त्याचा काहीच अधिकार नाही. आणि म्हणूनच गीतेमध्ये कृष्णाने म्हटले आहे. 

            “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” – “करम करो फल की इच्छा मत करो”

 

त्यामुळे आपण फक्त कर्म करत राहिले पाहिजे.आणि त्यातून मिळणार्या फळाची अपेक्षा त्या परमेश्वरावर सोपवली पाहिजे.अशाने काय होईल?

एकतर त्या  कर्म करणार्या कर्त्याला “मी” पणा राहणार नाही आणि त्याने जर चांगले कर्म केले तर तो त्याची चांगली फळे नक्कीच भोगेल. आणि वाईट कर्म केले तर त्याच्या पदरात वाईटच पडेल. हे गणित अगदी साध आहे.

  • नेकी कर दरिया मे डाल – या, एका महामंत्रला प्रत्येकाने आपल्या जीवनात आत्मसात केल तर त्याचा “मी” पणा गळून पडायला वेळ लागणार नाही.

आपल्याकडे खरी परिस्थिती अगदी याच्या उलट आहे.आपल्या अवतीभोवती असे अनेक लोक असतात, जे चांगले कर्म करत असतात पण त्याचा गाजावाजा जास्त करतात.

एखाद्य सत्कर्म त्यांच्या हातून घडलं तर ते चारचौघात कधी सांगतो आणि स्वतःची श्रेष्ठता कशी वाढवतो याच्याच प्रयत्नात ते असतात. पण असं केल्याने , ते  लोक त्यांनी केलेल्या सत्करमाला मी पणाच खतपाणी तर देतातच पण मिळवलेल्या पुण्याचा साठा हा नक्कीच कुठेतरी कमी करत असतात.

 

  • अशी मान्यता आहे की 84 दश लक्षयोनी नंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. मग काय वेगळेपण आहे या मनुष्य जन्मात , आणि इतर प्राणी, पशु, पक्षी कीटक यांचा जन्मात. फरक अगदी साधा आहे. मानव या  प्राण्याव्यतिरिक्त इतर सर्व जीव हे फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगत असतात.. त्यांना समाजात, जगात काय चालले आहे याच्याशी  काही देणं घेणं नसतं. परंतु मनुष्यजन्म मात्र तसा नाही. हां, जन्म मिळाला आहे तर तो स्वतःसाठी फक्त नं जगता दुसरासाठी आपल्याला जगता यावं म्हणून..आणि हे सर्व करण्यासाठी किंवा करत असताना आपल्याला जे मार्गदर्शन मिळत , जी बुद्धी आणि शक्ती मिळते ती त्या अज्ञात शक्ती कडूनच. 

त्यामुळे आपल्याकडून कोणतही चांगले कर्म घडत असताना ,  आपण समाजाचे काही देणे लागतो , आणि याची परतफेड आपल्यामार्फत होत आहे , ही भावना आणि जाणींव  कायम ठेवली तर आपल्यातला हा मी पणा मोडून काढायला आपल्याला जास्त बळ लागणार नाही…

  • आता गम्मत बघा….आपलं शरीर किवा हा निसर्ग ज्या पंचमहाभूतांनी बनलेला आहे , ही पंचमहाभूतं तरी आपल्या मी पणाची किंवा अस्तित्वाची जाणीव आपल्याला करून देतात का? ते फक्त त्यांचं सृष्टी चालवण्याचा कार्य अविरतपणे करत असतात.

उदाहरणार्थ.

1.पाणी – मी तुमची तहान भागवते.मी नसेल तर तुमच्या जीवनाला काय अर्थ?

2.हवा – मी पुरवत असलेल्या ऑक्सिजन चा पुरवठामुळेच आज तुम्ही सर्वजण जिवंत आहात.याची जाणीव कधी हवा आपल्याला करून देते का?

3.अग्नी – मी प्रज्वलित झाल्यामुळे तुम्ही तुमचे अन्न शिजवून खाऊ शकता.

4.माती [पृथ्वी.] – मी आहे म्हणून तुम्ही तुमचे धान्य पिकवू शकता.

5.आकाश – मी आहे म्हणूनच तुम्हाला पाऊस मिळतो आणि तुम्ही तुमचे धान्य पिकवू शकता.

अशा या पंचमहाभूताना , आपल्या अस्तित्वाचा मीपणा नसेल तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला तो का असावा? 

माझ्या पाहण्यात काही उदाहरणे अशी पण आहेत कि , पुण्य कर्म करणारा व्यक्ती असतो एक. पण त्या केलेल्या पुण्यकर्माच्या बढाया त्यांचे हितचिंतक आणि जवळची मंडळी कायम गात असतात. [माझ्या xyz व्यक्तीनेअमुक केलं तमुक केलं.]

अशाने होतं काय? तर पुण्य कर्म करणारा माणूस राहतो बाजूला पण त्यांच्या कर्तेपणाचा मी पणा मिरवणारी एक नवीन पिढी तयार होत जाते. अगदी त्यांच्या नकळत.

आपण जोपासलेल्या या “मी” पणामुळे अनेक कुटुंब विखुरलेली मी फार जवळून पाहिली आहे , एकत्र कुटुंब पद्धत लोप पाऊण आता विभक्त कुटुंब पद्धती जास्त दिसत आहे. 

कुटुंबातल्या सर्व छोट्या मोठ्या वादाची मूळ कारण या “मी” पणाचा मूळाशीच आहेत. हे सत्य जरी कटू असलं तरी नाकारता येणार नाही.

कधी कधी या “मी” पणाचा अहंभाव लोकांच्या वाणीत नसला तरी मनात आणि विचारात कायम असतो आणि म्हणूनच की काय आजकाल खोट्या स्वभावाचे मुखवटे घालून वावरणारी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूलाच असतात. 

जीवनातल अजून एक सत्य… 

आपण केलेल्या या सर्व चांगल्या वाईट कर्मांचा आणि आपण मिरवलेल्या मी पणाचा हिशोब आपल्याला कोणत्याही पास बुकमध्ये किंवा गूगल वर शोधून सापडणार नाही. 

तो लिहून ठेवला जातो तो फक्त आणि फक्त कर्म नावाचा डायरीमध्ये

जी आपल्याला कधीच दिसत नाही.पण त्यावर आपल्या साता जन्माचा हिशोब अगदी काटेकोरपणाने आणि बिनचूकपणे उतरवलेला असतो त्या अज्ञात शक्तीने.

या मीपणाचा अहंभाव नष्ट करायचा असेल तर यावर रामबाण उपाय म्हणजे  “कृतज्ञता”…..

आपल्या आयुष्यात घडत असलेली प्रत्येक घटना , प्रत्येक क्षण मग ती चांगली असो किंवा वाईट.

कृतज्ञ राहणे या सर्व  चांगल्या वाईट घटनांबद्दल. कारण या घटना म्हणजे आपल्याला मिळालेलं आपल्याच कर्माचे फळ.

कोणतंही चांगलं कर्म करत असताना ,  त्याच्याकडे “मी” केलं ही भावना ठेवण्यापेक्षा परमेश्वराने हे सत्कर्म करायला मला निवडलं आहे. पण हे सर्व कर्म त्याचा तोच माझामार्फत घडवून आणतो आणि मी फक्त निमित्तमात्र असतो… ही भावना खरंच उपयोगी ठरेल आपल्यातला मीपणा कमी करण्यासाठी.

 एखादी चांगली घटना आपल्या आयुष्यात घडल्यावर आपण त्या परमेश्वराला प्रश्न करतो का? पण ते जर वाईट घडलं तर लगेच देवापुढे मीच का?मलाच का ?  अशा प्रश्नांचा पाडा आपण देवापुढे वाचतो…आणि अर्थातच या सर्वांची उत्तर आपल्याला मिळाली नाही तर या सर्वांचा त्रास आपण करून घेतो.

आज या क्षणाला तुमच्या पदरात जे आहे जसं आहे ते खूप आहे.मी केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ आहे आणि यात मी खुश आहे, आनंदी आहे. या कृतज्ञतेच्या दोन ओळी जर आपण आपल्या रोजच्या प्रार्थनेत ठेवल्या तर आपली चांगली प्रगती नक्कीच होत राहिल…. यामध्ये तिळमात्र शंका नाही.

असा हा माझ्यातला मी .….

जेव्हा आपल्याकडून एखाद्याच चांगलं होतं तेव्हा संपूर्ण क्रेडिट घेणारा……..पण तेच एखाद्याचे वाईट घडल तर इतरांचा कर्माला दोष देणारा..

 

असा हा माझ्यातला मी….

दुसर्यांचे प्रॉब्लेम सोडवताना न्यायाधीशाची भूमिका बजावणारा, पण तेच प्रॉब्लेम जेव्हा स्वतःच्या आयुष्यात येतात तेव्हा त्याची वकीली करणार.

 

अशा अनेक प्रसंगातून आपल्या आयुष्यात डोकावत असलेला हा “मी” पणाचा विषरूपी प्याला , मी पूर्णपणे त्यागू शकलो नाही. पण त्यासाठी माझे प्रयत्न नक्कीच चालू आहेत..

तुम्ही ही जरा डोकावून बघा तुमच्या अंतर्मनात , आणि शोधून काढा हा “मी” पणा कुठे कुठे दडून बसला आहे ते.…. 

इन्सान करता वही जो वो चाहता है……लेकिन उसको मिलता वही जो उपरवाला चाहता है

                                                   इससे अच्छा……………………………

आप करो वही जो उपरवाला चाहता है…… तो आपको मिलेगा वही जो आप चाहते हो………. 

धन्यवाद. 

 

Previous
Next

Written By

Tushar Karande

Tushar Karande

IT professional , 17+Years in experience , typical AMCHI MUMBAI guy from Thane. Loves travelling , spirituality talks , writing & dance. I live life @ Three basic principle 1. Nobody is perfect but Everyone is unique [ So respect all & their feelings] 2.Sharing is Caring [ Always share what you have , because its blessing to be helping hand for someone else] 3.Miracles Do happen - Do your best & have faith on divinity , you will get what you mean for sure.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *