नमस्कार मंडळी.
आज या गोष्टींमध्ये….मी तुम्हाला थोडसा फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाणार आहे.असा फ्लॅशबॅक खरतर सर्वांच्याच आयुष्यात या- ना त्या कारणांवरून घडलेला असेल. पण काळाच्या ओघात आणि नेहमीच्या रहाटगाड्यात , अनेक जबाबदारीच ओझं सावरता सावरता… त्यावर थोडीशी धुळ जमा झालेली आहे. हिच धुळ थोडीसी बाजूला सारून मी मागच्या काही सुंदर आठवणींची खजिना आज तुमच्या समोर ठेवणार आहे , बघा तुम्हाला त्यातून काय काय वेचता येत ते?
आपण डोकावूयात साधारणपणे 1993 ते 95 या काळात…..तसा हा काळ काही जास्त जुना नाही.
पण आजच्या नव्या पिढीला नक्कीच तो थोडासा बोरिंग वाटत असणार यात शंका नाही…असो……..
साधारणपणे वयाच्या10- 11 व्या वर्षी म्हणजे इयत्ता पाचवीमध्ये पदार्पण झाल्यावर मोठ्या उत्साहाने मी घरात एक फर्मान सुनावले. ते म्हणजे , मी आता दादासारखा [म्हणजे माझा मोठा भाऊ सागर] याच्यासारखा मोठ्या वर्गात जाणार आहे. यापुढे माझा प्रवास हा शाळेचा स्कूलबसमधून न होता मी तो स्वतः.एकटा बेएसटीच्या बसने करणारा आहे.
शाळा ते घर यामध्ये अंतर काही जास्त नव्हतं आणि त्यातच माझा बाल वर्गमित्र , सोसायटीतली मित्र , सर्वजण ऑलरेडी बेस्टचा प्रवास करत होते. म्हणून मग माझ्या या फर्मानाला आई बाबांचा विरोधअजिबात झाला नाही…कारण मदतीला दादा हा होताच. त्यामुळे एकदाचं माझं शालेय शिक्षण हे पब्लिक ट्रांसपोर्ट विथ फ्रेंड्स या तत्वावर रुजू झाले, आणि मला पण काहीस स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद मनात उभारी देऊन जात राहीला.
मी आणि माझा दादा आम्ही दोघे बेएसटीने प्रवास करायचो.त्यावेळेस स्टूडेंट्स पास असल्या कारणाने आमचं तिकीट फक्त पंचाहत्तर पैसे किंवा ₹1 इतकच असायचा. तसा हिशोब केला तर दिवसाचे ₹2 गाडी प्रवासालाआणि एक्स्ट्रा चे ₹2 मधल्या सुट्टीत आवला, चिंचा , बोरे , कैरी असे म्हणून खायला आम्हाला रोज मिळायचे.घरून आई जेवणाचा डब्बा देत असे.
मला अजून आठवते आमच्या शाळेतल्या कँटीनमध्ये वडे , समोसे , इडली सांभार ,असे चविष्ट पदार्थ रोज बनायचे आणि शाळेतला प्रत्येक विद्यार्थी या चवीचा आस्वाद घेण्यासाठी नेहमीच आतुर असायचा.त्यामुळे त्याला मीही काही अपवाद नव्हतो.
आम्हाला दोन मधल्या सुट्या असायचा , पहिली सुट्टी 20 मिनिटांची आणि दुसरी सुट्टी ही 45 मिनिटांची.अशा या दोन सुट्टय़ांमध्ये सहसा सर्व विद्यार्थी पहिल्या मधल्या सुट्टीत..आईने दिलेला डबा खाऊन घेत असे.आणि दुसरा सुट्टीत शिवाजी पार्कात खेळायला किंवा भटकंती करायला सत्कारणी लावत असे.
माझ्यासाठी दुसरी मधली सुट्टी खास असायची. का म्हणून विचारताय? भटकंती करायला मिळते म्हणून की पार्कात फिरायला मिळते म्हणून , खरतर यापैकी काहीच नाही. माझ्यासाठी ही दुसरी मधली सुट्टी खास बनायची कारण या सुट्टीत मला माझ्या दादाकडून ₹2 मिळायचे.
हो , खर आहे. या मोठ्या मधल्या सुट्टीचा उपयोग मी माझ्या दादाकडून ₹2 उकळण्यासाठीच करायचो. कधी प्रेमाने , कधी हट्टाने , तर कधी अगदी रडून गोंधळ करून , सहा दिवसांपैकी जवळ जवळ तीन ते चार दिवस मी ₹2 मिळवण्याचा हट्ट माझ्या दादाकडे करत असे
आता प्रश्न असा की या दोन रुपयाचं मी नेमकं करायचं काय?….उत्तर अगदी सोप्पं आहे , शाळेतला वडा , समोसा, यावर ताव मारण्यासाठी, तर कधी मित्रांसोबत सोलो नावाच प्रसिद्ध आइस्क्रीम खाता यावं यासाठी……कधीकधी काही मित्रांकडे.पुरेसे पैसे नसायचे मग एकत्याने या सर्व गोष्टी करण मनाला कधी पटलच नाही. मग शेअरिंग बेसिसवर किंवा मित्राला उसने म्हणून का होईना हे ₹2 माझ्या खिशात कसे पडतील याचा मी नेहमी प्रयत्न करायचो.
बघता बघता वर्ष सरत गेली.आणि दादाची 10 वी होऊन त्याने शाळेचा निरोप घेऊन कॉलेजचा उंबरठा गाठला.माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये तसे चारवर्षांच अंतर , त्यामुळे त्याची 10 वी झाली आणि मी माझी सहावी ईयत्ता पूर्ण केली.
खरी गंमत तर इथे चालू झाली , कारण दादा शाळा सोडून गेल्यावर आता मला लागणारे एक्स्ट्रा चे ₹2 कोण देणार?याची कमी भासू लागली….त्या वेळेस मला त्या.₹2 ची खरी किंमत आणि त्याहीपेक्षा दादाची शाळेतली असलेली अनुपस्थिती जास्त जाणवू लागली.
मला दादाकडून मिळत असलेल्या त्या ₹2 ने माझ्या मनात खूप काही प्रश्न कालांतराने निर्माण केले..आणि त्याहीपेक्षा मला खूप काही शिकवण देऊन गेले….
- मी रोज पैशाचा हट्ट करून देखील दादा माझ्यावर कधीच का बरं चिडायचा नाही??रागवायचं नाही??आणि यामागचं मलाच उमगलेले उत्तर म्हणजे….
त्याच निस्वार्थी प्रेम , आणि कदाचित एक मोठा भाऊ असल्याने माझे सर्व हट्ट , लाड पुरवण्यात त्याला मिळत असलेला आनंद.
- त्याने कधीच मला रिकाम्या हाताने परत पाठवले नाही………….. कारण…..मी रुसल्यावर किती वाईट दिसतो?आणि माझा पडलेला चेहरा पाहणं त्याला कदाचित आवडत नसेल..
- कधी कधी तो वर्गात नसला तर मी त्यांच्या मित्रांकडे निरोप देऊन यायचो…..मी त्यांना सांगायचो की मी येऊन गेलो म्हणून सागरला सागा , आणि असा निरोप मिळताच तो दुसरा क्षणी माझ्या वर्गासमोर उभा रहायचा…….. कारण…..त्याला माझ्याबद्दल वाटत असलेली काळजी आणि मी त्याची वाट बघत बसलो असणार याची जाणीव…
- मी त्याच्याकडून एक्स्ट्रा चे पैसे घेतो हे तो घरी आईबाबांना कधीच बोलला नाही आणि या विषयाची वाच्यता कधी आईबाबांसमोर केलीही नाही…….का? खर तर तो हे सहज करू शकला असता.
कारण…………..आई बाबांचा राग माझ्यावर पत्करेल यासाठी त्याने घेतलेली ही काळजी ; अर्थात मी घरात असलेल शेंडेफळ.याचा केलेला सांभाळ.
- बाबांकडून आम्हा दोघांनाही .समान पैसे मिळाल्यावरही त्याच्याकडे.एक्स्ट्रा चे पैसे कुठून येणार?याचा विचार.मी कधी केलाच नाही.
पणनंतर जाणवले की स्वतःला मिळालेले ते खाऊचे.₹2 तो वाचवत राहिला आणि प्रत्येक वेळी माझ्या आनंदाखातर ते पैसे मला पुरवत राहीला.
या आणि अशा बर्याच गोष्टींचा उलगडा झाल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याविषयीचा आदर आणि प्रेम आणखीनच वाढत गेला आणि तो कायम राखण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.
एखाद्या व्यक्तीवर किंवा नात्यावर निशब्द, प्रेम कसे करता येते याचा अनुभव आणि शिकवण त्याने मला या सर्व गोष्टीतून करून दिली.
वेळ….कायमच पुढे सरकत राहिली. माझी चाळीशी आणि त्याची चव्वेचाळीशी इथपर्यंत येऊन आम्ही पोहोचलो , आमचे स्वतंत्र संसार फुलत राहिले पण हे होत असतानासुद्धा आजतागायत , आयुष्यातल्या प्रत्येक मोठ्या टप्प्यावरती तो नेहमीच माझ्यासोबत उभा राहिला आहे.
मला मिळालेला.माझा ड्रीम जॉब,……….. मलेशिया या परदेशांत जातअसताना त्याने हातावर ठेवलेल पैशांचे पाकीट असो…..किंवा माझं स्वप्नातलं घर घेत असतान त्याने केलेली आर्थिक मदत असो…..वेळोवेळी हेच सांगून जाते की तू चालत रहा, प्रगती करत रहा , मी तुझ्या पाठीशी खंभीरपणे उभा आहे आणि आजही तो हे सारे न बोलता करत असतो.
आठवणीतल्या त्या दोन रूपयांची चर्चा आज होत नसली तरी त्याचे ते निशब्द प्रेम हे कोणत्याच पैशाने तोलता येणार नाही आणि मला त्याची परत फेड करणे या जन्मी तरी शक्य नाही.
आठवणीतले ते ₹2……….
पैशांची किंमत ही प्रेमापेक्षा नक्कीच मोठी नसते….आणि
निशब्द, प्रेम कसे करावे? याचे धडे मला शिकवून गेले.
तुमचाही जीवनात कोणी तरी नक्की असेल, असे निशब्द प्रेम करणारे , त्यांना ओळखा , जाणा , त्यांची कदर करा.आणि आयुष्यात कधीच त्यांची साथ सोडू नका
धन्यवाद.